विशेष प्रतिनिधी
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी हे पद भूषवणारे विवेक फणसाळकर हे सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी भारती यांची निवड झाली आहे. ( Deven Bharti appointed as Mumbai Police Commissioner)
देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी मुंबई पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वी कारकीर्द पार पाडली आहे. डीसीपी (गुन्हे), अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), तसेच महाराष्ट्र ATS (दहशतवादविरोधी पथक) प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात करण्यात आली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले आणि त्यांनी विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू अधिकारी मानले जातात. 2014-2019 दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री असताना, भारती यांनी कायदा सुव्यवस्था विभाग सांभाळला होता. त्याच काळात मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा अतिरिक्त महासंचालकावरून महासंचालक स्तरावर नेण्यात आला होता. मात्र, यावेळी ही नियुक्ती पुन्हा अतिरिक्त महासंचालक (ADG) दर्जावर झाली आहे.
मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतील पोलीस आयुक्तपद हे जबाबदारीचे स्थान आहे. अशा वेळी देवेन भारती यांच्यासारखा अनुभवी आणि धडाडीचा अधिकारी या पदावर येणे, हे शहरासाठी सकारात्मक पाऊल मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक भक्कम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
