विकसित महाराष्ट्रासाठी कटिबद्ध; राज्यपालांचे महाराष्ट्र दिनानिमित्त आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई: “सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक, पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताला अमृतकाळात विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्राचे योगदान निर्णायक ठरेल. आपण सर्वांनी मिळून आधुनिक, बलशाली आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित ६६व्या महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

राज्यपालांनी सांगितले की, महाराष्ट्रात सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत असून, यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. सायबर गुन्हे नियंत्रण, सायबर सुरक्षा धोरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण यांचा त्यात समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडच्या दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचात राज्याने १५ लाख ७२ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून, यामुळे जवळपास १५ लाख ९५ हजार रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

राज्यात स्टील, आयटी, हरित ऊर्जा, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, डेटा सेंटर्स, अवकाश व संरक्षण, औषधनिर्मिती, ड्रोन आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ‘स्टील हब’ म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने ९ स्टील प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, यामुळे सुमारे ५० हजार रोजगार निर्माण होतील. एकूण ७८ औद्योगिक युनिट्सना देकारपत्रे देण्यात आली असून, यामुळे सुमारे ६.५५ लाख कोटींची गुंतवणूक होणार असून २.४७ लाख रोजगार संधी उपलब्ध होतील.

राज्यपालांनी सांगितले की, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत ‘उज्वला’ आणि ‘माझी लाडकी बहिण’ योजनांच्या लाभार्थींना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रती हेक्टर २० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३,३८९ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात १ लाख सौर पंप बसवण्यात आले आहेत. बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ एचपीपर्यंतच्या ४५ लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज दिली जात आहे.

मागील हंगामात ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली असून, ही देशातील सर्वाधिक खरेदी असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.