विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर मिळावे या उद्देशाने ‘माझे घर-माझे अधिकार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत राज्य सरकारने 70 हजार कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून, झोपडपट्टी पुनर्वसनापासून ते पुनर्विकासापर्यंत सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ( Guaranteeing housing for all through the My Home-My Rights schemeChief Minister Devendra Fadnavis announces investment of Rs 70 thousand crores)
आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “ नव्या गृहनिर्माण धोरणामुळे शहरांतील गरजू नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे मिळणार आहेत. तसेच झोपडपट्ट्यांचे सशक्त पुनर्विकास करून त्याठिकाणी सुसज्ज घरांची उभारणी केली जाणार आहे.”
या बैठकीत केवळ गृहनिर्माणच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये सिंचन प्रकल्प, न्याय व्यवस्थेचा विस्तार, पर्यावरणपूरक इंधन प्रकल्प आणि औद्योगिक धोरणे यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना (धुळे):
एकूण सुधारित खर्च – ₹5,329.46 कोटी
लाभ – 52,720 हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा
अरुणा मध्यम प्रकल्प (वैभववाडी, सिंधुदुर्ग):
सुधारित खर्च – ₹2,025.64 कोटी
लाभ – 5,310 हेक्टर सिंचन क्षेत्र
पोशिर प्रकल्प (कर्जत, रायगड):
प्रशासकीय मंजुरी – ₹6,394.13 कोटी
शिलार प्रकल्प (कर्जत, रायगड):
प्रशासकीय मंजुरी – ₹4,869.72 कोटी
दिवाणी न्यायालय (कारंजा, वाशिम):
वरिष्ठ स्तराचे न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय
एकूण खर्च – ₹1.76 कोटी
28 पदांच्या निर्मितीस मंजुरी
बायोगॅस प्रकल्प (देवनार, मुंबई):
महानगर गॅस लिमिटेड ला भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध
बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर
औद्योगिक प्रस्तावांना मंजुरी:
कालबाह्य धोरणांमुळे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी
धोरण कालावधी संपुष्टात आल्यावरही रोजगार, उद्योगवाढीस चालना
या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांचा सहभाग होता.
