कायद्याच्या राज्याचा अपमान, निवडणूक आयोगाने फेटाळून लावले राहुल गांधींचे आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीवर केलेले आरोप निराधार असून हा कायद्याच्या राज्याचा अपमान असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले आहे. (Election Commission rejects Rahul Gandhis allegations of insulting the rule of law)

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर एकतर मौन बाळगले किंवा आक्रमक वृत्तीने उत्तर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) तीव्र नाराजी व्यक्त करत राहुल गांधींना उत्तर दिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात सर्व तथ्ये स्पष्ट केली आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचेही म्हटले आहे. मात्र, वस्तुस्थितीकडे कानाडोळा करून असे मुद्दे पुन्हा पुन्हा उपस्थित केले जात असल्याचे आयोगाने सुनावले आहे.

कोणाकडूनही पसरवलेली कोणतीही चुकीची माहिती ही कायद्याचा अनादर करण्याचेच द्योतक आहे. विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी ही बाब आहे. अशा चुकीच्या माहितीमुळे निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचते. मतदारांनी प्रतिकूल निर्णय दिल्यावर निवडणूक आयोगाशी हातमिळवणी झाली आहे, असे सांगून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न पूर्णपणे तथ्यहीन आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी विविध भाषांतील वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या लेखामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप केला आहे. आपण सांगोवांगी माहिती बाजूला ठेवली तरी, अधिकृत आकडेवारीवरून संपूर्ण खेळ उघड होतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या 8.98 कोटी होती. पाच वर्षांनंतर, मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 9.29 कोटी झाली. फक्त पाच महिन्यांनंतर म्हणजेच नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या 9.70 कोटी झाली. म्हणजेच, पाच वर्षांत मतदारांची 31 लाखांची किरकोळ वाढ झाली तर, अवघ्या पाच महिन्यांत 41 लाखांची मोठी वाढ झाली. मतदारांची संख्या 9.70 कोटींपर्यंत पोहोचणे अविश्वसनीय आहे, कारण खुद्द सरकारचीच आकडेवारी सांगते की, महाराष्ट्राची एकूण प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.