राज ठाकरेंसोबत युतीसाठी मातोश्रीवर बैठक, चंद्रकांत खैरे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज-उद्धव एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती. बैठकीत उद्धव ठाकरे युतीसाठी तयार आहेत.
आपण हात पुढे करायला तयार आहोत, ते टाळी देतात का पाहू, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ( Meeting at Matoshree for alliance with Raj Thackerayclaims Chandrakant Khaire)
मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सूचक विधाने केली जात आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चंद्रकांत खैरे म्हणाले, या युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर दिली होती. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी हे दोघे बंधू एकत्र यावेत ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली आहे. राज व उद्धव यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्ही केवळ इच्छा व्यक्त करतो. प्रत्यक्ष त्यांनी एकत्र आले पाहिजे. या दोघांसह शिंदे यांनीही एकत्र येऊन एक अखंड शिवसेना तयार करावी. शिवसेनेच्या विभाजनामुळे शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले. आज दोन्ही बंधू एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहेत. ते ही या युतीत आले पाहिजेत, असे कीर्तिकर म्हणाले.

दरम्यान, मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न सध्या आपल्या अखत्यारित नसल्याचेहटले आहे.