विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहे. मुंबईतील कालिना या भागातील माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी राज ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्डे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ( MNSs only former corporator in Mumbai also joined Shindes Shiv Sena)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा राज्यातील असा पक्ष आहे, ज्यांचा एकही आमदार नाही, खासदार नाही किंवा कुठे नगरसेवकही नाही. पक्षाकडे सत्ता नसल्याने आता एकेक नेता ठाकरेंची साथ सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यातील तात्या अर्थात वसंत मोरे यांनी मनसेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला होता. त्यानंतर आता कोकणातील नेते आणि पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे सुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे हे सोमवारी (ता. 9 जून) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला तुर्डे यांचे मनपरिवर्तित करण्याला यश आले आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंचा एकमेव माजी नगरसेवकही फुटला आहे. संजय तुर्डे यांच्यासोबत कलिना परिसरातील मनसेचे पदाधिकारी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे एकूण सात उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी माजी नगरसेवक दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मारे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र संजय तुर्डे यांनी मनसेत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संजय तुर्डे हे मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक होते. पण 2022 मध्ये जेव्हा शिवसेना फुटली. त्यावेळी मनसेतून ठाकरे गटात असलेल्या 6 पैकी 4 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यातील केवळ दोन नगरसेवक अजूनही ठाकरे गटात आहेत.
माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कारण येत्या काही महिन्यात मुंबईत महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने संजय तुर्डे हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते होते. पण शिंदे गटाने राज ठाकरेंचा एकमेव नगरसेवकही फोडला आहे. तुर्डे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर मनसेच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.
