विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने राहुल गांधींनी आता ‘मॅच फिक्सिंग’च्या थेट आरोपांकडे वळत स्वतःच आपल्या पक्षाच्या अपयशाची कबुली दिली आहे. त्यांनी लिहिलेला लेख देशभरातील अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला असून, भाजपवर आणि निवडणूक आयोगावर एकतर्फी आरोप करत त्यांनी पराभवाची जबाबदारी झाकण्याचा प्रयत्न केला आहे. ( Rahul Gandhi himself admitted Congressdefeat!)
राहुल गांधींच्या या लेखावर सर्व राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या, पण अनुभवी नेते शरद पवार यांनी मात्र तो लेख सकाळी बाजूला ठेवून संध्याकाळी शांतपणे वाचणार असल्याचे सांगितले. ज्यावरूनच या लेखाचं गांभीर्य आणि त्यातल्या तर्कांची शंकेखोरता स्पष्ट होते.
या लेखात राहुल गांधींनी म्हटले आहे की महाराष्ट्रात निवडणूक आयोग, मतदार यादीतील फेरफार, शेवटच्या टप्प्यातील संशयास्पद मतदान वाढ, आणि पुरावे दडवण्याचे प्रकार घडले. परंतु त्यांनी एकाही ठोस पुराव्याशिवाय हे सर्व आरोप करत भाजपने ‘पंच’ मॅनेज केल्याचे हास्यास्पद विधान केले. यामधून राहुल गांधींचा हतबलपणा आणि राजकीय अपरिपक्वता पुन्हा समोर आली आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १३ जागा जिंकल्या होत्या आणि एक अपक्षही त्यांच्या गळाला लागला होता. परंतु त्याच युतीतील मित्रपक्षांनीच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला याकडे राहुल गांधी डोळेझाक करत आहेत. एक प्रकारे काँग्रेसच्या संघटनात्मक अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्नच म्हणावा लागेल.
बिहारमध्ये अद्याप निवडणुकीची तारिखही घोषित झालेली नसताना राहुल गांधींनी तिथेही मॅच फिक्सिंगची तयारी सुरु असल्याचा दावा केला आहे. हे वाचून प्रश्न पडतो की, पराभव होण्याआधीच राहुल गांधी त्याची तयारी करून ठेवतात का? बिहारमध्ये कन्हैया कुमारला चेहरा म्हणून पुढे करताना, दुसरीकडे तेजस्वी यादवने काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, स्वतःच्या राजकीय निर्णयांमधील चुकांची कबुली न देता राहुल गांधी पुन्हा ‘मॅच फिक्सिंग’चा कंठशोष करत आहेत.
काँग्रेसच्या प्रत्येक पराभवानंतर “ईव्हीएम”, “मॅच फिक्सिंग” किंवा “लोकशाही संकटात” असे ठरलेले रडगाणे लावून राहुल गांधी देशवासीयांना किती काळ फसवणार, हा खरा प्रश्न निर्माण होतो. एका राष्ट्रीय पक्षाचा नेता पराभव स्वीकारून पुन्हा उभा राहण्याऐवजी कायमच दोषारोपांच्या गोंधळात अडकून पडतो आहे, हे पक्षाच्या भवितव्यासाठी धोकादायक संकेत आहेत.
