विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील २०२४ विधानसभा निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा, निवडणूक आयोगाच्या सहकार्याने निकाल फिक्स केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला असून, ” निवडणूकांतील सलग पराभवानंतरच्या नैराश्यातून हा राहुल गांधींचा खोटं आख्यान रचण्याचा प्रयत्न आहे,असे त्यांनी म्हटले आहे. ( Rahul Gandhi is disappointed after losing the election trying to create a false narrative J.P. Naddas attack)
नड्डा यांनी एका सविस्तर पोस्टमधून काँग्रेस पक्षावर गंभीर टीका केली. त्यांनी म्हटले की, “काँग्रेस पक्षाला त्यांच्या पराभवाचं कारण आपल्या वागणुकीत, धोरणांत, आणि नेतृत्वात सापडत नाही. त्याऐवजी ते नेहमी बोगस षड्यंत्र तयार करतात, खोटे आरोप करतात आणि देशातील स्वायत्त संस्थांची बदनामी करतात.”
नड्डा म्हणाले की, “हे लोक वारंवार अपयशी होत असूनही निर्लज्जपणे खोटं बोलत राहतात. त्यांना माहित आहे की बिहारसह अनेक राज्यांमध्ये जनतेने त्यांना नाकारले आहे. तरीही ते प्रसारमाध्यमांत टिकून राहण्यासाठी अशा खोट्या आख्यायिकांचा सहारा घेतात.”
राहुल गांधींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी, केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राहुल गांधी अशा प्रकारे दिशाभूल करत आहेत. लोकशाहीला नाटकी आरोपांची गरज नाही, तर सत्य आणि जबाबदारीची गरज आहे.”
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप फक्त निव्वळ अपयश लपवण्यासाठीचे आहेत. “सत्य हे आकडेवारीत आणि जनतेच्या निर्णयात दिसून येते. निवडणुका हरल्यावर स्वतःचा आत्मपरीक्षण करण्याऐवजी देशातील लोकशाही संस्थांवर शंका घेतल्यास त्यांचीच विश्वासार्हता धोक्यात येते. काँग्रेसचे नेतृत्व ‘बातम्यांमध्ये राहण्यासाठी’ खोटे आख्यान तयार करत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे, पण तरीही हे लोक वास्तव स्वीकारायला तयार नाहीत, असेही त्यांनी सुनावले आहे.
