विशेष प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीचा पायाच खचला आहे. या डळमळत्या आघाडीसाठी राज ठाकरे यांच्यासारखा सहकारी हवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. ( Shaky Mahavikas Aghadi Supriya Sule wants a colleague like Raj Thackeray!)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना जोर मिळाला आहे. “आता थेट बातमीच देणार,” असे सांगत उद्धव ठाकरेंनी सूचक आणि लक्षवेधी विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीत कोणाला कोणासोबत जायचे याचा पूर्ण अधिकार आहे. जर दोन्ही बंधू एकत्र येत असतील, तर ती एक चांगली बाब आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टीने जितके सहकारी अधिक असतील, तितके चांगले. आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काम करायला तयार आहोत. राज ठाकरे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीही अडचण नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यानंतर या चर्चांना नवे परिमाण प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, “आता थेट बातमीच देणार आहे.” या वाक्याने खळबळ उडाली आहे. अनेकांनी हे वक्तव्य राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युती किंवा एकत्र येण्याच्या पार्श्वभूमी वरचे संकेत मानले आहेत.
महाविकास आघाडीत सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (UBT), शरद पवार यांचे NCP (SP), आणि काँग्रेस सहभागी आहेत. मात्र तिन्ही पक्षाची स्थिती नाजूक आहे. दररोज नेते आणि कार्यकर्ते सोडून जात आहेत. त्यामुळे जर राज ठाकरे यांची मनसे महा विकास आघाडीत सहभागी तर महाविकास आघाडीला थोडीशी ताकद मिळेल. शहरी व युवा मतदारांमध्ये असलेला मनसेचा प्रभाव महाविकास आघाडीच्या बाजूला वळवता येईल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
राज ठाकरे यांनी 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली होती. त्यानंतर ते आणि उद्धव ठाकरे राजकारणात स्वतंत्र मार्गाने चालत राहिले. अनेक वेळा दोघांमध्ये परस्परविरोधी भूमिका दिसून आल्या. काही वेळा परस्परविरोधी टीका-सूचना देखील रंगल्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये थोडीफार मवाळता दिसू लागली आहे. विशेषतः राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळे, ते भाजपच्या जवळ गेले असले तरी, काही मुद्द्यांवर त्यांनी स्वतंत्र मत मांडण्याचेही दिसले.
