विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय नौदलासाठी एक मोठी झेप ठरणारा देशात बनलेला पहिला प्रवासी ड्रोन ‘वरूण 100’ आता प्रकाशझोतात आला आहे. सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या पुण्यातील चाकण स्थित भारतीय कंपनीने तयार केलेल्या या मानवरहित हवाई वाहनाची (Passenger Drone) चाचणी यशस्वी झाली असून, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य, वाहतूक आणि लष्करी उपयोगासाठी याचा वापर होणार आहे.
( Indias first passenger drone Varun 100 successfully tested)
‘वरूण 100’ हे मानवरहित एरियल व्हेईकल (UAV) १०० किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. म्हणजेच, एक व्यक्ती किंवा सामान याचा वापर करून सुमारे २५ ते ३० किमी अंतर सहज पार करता येते. पूर्ण भारासह या ड्रोनचा उड्डाणकाल सुमारे ३० मिनिटांचा आहे. विशेष म्हणजे, स्वयंचलित टेक-ऑफ व लँडिंग या तंत्रज्ञानासह ‘वरूण 100’ समुद्रावरील जहाजावरूनही कार्यान्वित करता येतो.
भारतीय नौदल या ड्रोनची तैनाती भविष्यात नेव्हल रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल इव्हॅक्युएशन आणि जलद वाहतूक यासाठी करण्याचा विचार करत आहे. याशिवाय, आफ्रिकेतील काही देशांनीदेखील या भारतीय तंत्रज्ञानात स्वारस्य दाखवले आहे.
सध्या ‘वरूण 100’ हा प्रोटोटाइप स्वरूपात असून, त्याचे व्यापारीकरण आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक स्तरावर तयार झालेल्या या प्रवासी ड्रोनमुळे भारत ‘मानववाहक ड्रोन’ तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेकडे एक मोठे पाऊल टाकत आहे.
