विशेष प्रतिनिधी
पुणे: बसमधून उतरताना मदत करण्याचा बहाणा करून महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून पळून जाणाऱ्या चोरट्याला पीएमपी बस कंडक्टरने डिव्हायडरवरून उडी मारून पकडले. ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास महापालिका येथील पीएमपी बसस्थानकाच्या परिसरात घडली. ( Daring bus conductor Jumps over divider and catches thief)
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक करून त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
लखन सुहास जाधव (वय ३०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चाँद शेख (रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत रेणू हाडू साहू (वय ५६, रा. आनंदनगर, सणसवाडी, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सणसवाडी येथून बसने महापालिका बसस्थानकात आल्या होत्या. त्या बसमधून उतरत असताना त्यांच्या हातामध्ये पिशवी होती. तेथील दोघांनी त्यांना मदत करतो, असे म्हणून एकाने त्यांची पिशवी असलेला हात धरला. त्यावेळी बसमधील कंडक्टर म्हणाले, तुम्ही का थांबलात, उतरत का नाही?. त्यावर फिर्यादी म्हणाल्या, या माणसाने माझी पिशवी पकडून ठेवली आहे. त्यानंतर ती व्यक्ती पिशवी सोडून पळू लागला. त्यावेळी फिर्यादींनी आपल्या उजव्या हाताकडे बघितल्यानंतर हातातील सोन्याची बांगडी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. ते ऐकून बस कंडक्टरने एका बाजूने रस्त्यामधील डिव्हायडरवर उडी मारली आणि पळून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलावून घेत चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास पोलिस हवालदार दीपक रोमाडे तपास करीत आहेत.
