चेन्नई-पुणे एअर इंडिया विमान मानवी बॉम्बने उडविण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी

पुणे : चेन्नई ते पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. हा ईमेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ अलर्ट घोषित करून तपासणीला सुरुवात केली. त्यानंतर हा ई-मेल खोटा असल्याचे समोर आले. हा प्रकार 22 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 125 (4), 351 (4), 353 (1) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रशांत कुमार योगेंद्र बहादुर श्रीवास्तव (वय 47, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश, सध्या रा. टिंगरे नगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 39 मिनिटांनी एक मेल विमानतळ प्राधिकरणाला मिळाला. यामध्ये चेन्नईवरून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान क्रमांक 2661 मध्ये सुसाईड मानवी बॉम्बर असून हे विमान खाली उतरत असतानाच आरडीएक्स आयडी घेऊन निघालेला सुसाईड मानवी बॉम्बर विस्फोट करणार असल्याचा ई-मेल प्राप्त झालेला होता. यासोबतच या विमानाला खाली उतरण्याची परवानगी देऊ नये असे देखील ई-मेल मध्ये नमूद करण्यात आले होते.

त्यानंतर तात्काळ यंत्रणा सतर्क करण्यात आल्या. तपासणीला सुरुवात करण्यात आली. या ईमेलमुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मात्र, तपासणीअंती अफवा पसरवण्यासाठी केलेला ईमेल असल्याचे समोर आले. पोलिसांनी अफवा पसरवून भीतीदायक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी आणि प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विमानतळ पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *