विशेष प्रतिनिधी
पुणे : वायुदलाच्या संरक्षित परिसरामध्ये एका तरुणाने घुसखोरी करीत संरक्षककडे तोडण्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाला वेळीच ताब्यात घेतले असून त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संविधा 329 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 सप्टेंबर रोजी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
सनी सुनील बनसोडे (वय 28, रा. आई माताजी मंदिराजवळ, सोमनाथ नगर, वडगाव शेरी) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नेवासा तालुक्यातील राहणार आहे. याप्रकरणी अनुप कुमार वाजपेयी वय 44 सिक्युरिटी सेक्शन नाईन बीआरडी एअर फोर्स यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला 35 (3) प्रमाणे तपासासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांकडे दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सनी बनसोडे हा 24 सप्टेंबर रोजी एअरफोर्सच्या 9 बीआरडीच्या चंदननगर बाजूच्या ‘केवी थ्री’च्या गेट जवळ आला.
त्या गेटमधून त्याने आत मध्ये उडी मारली. 9 बीआरडीमध्ये त्याने प्रवेश केला. त्यानंतर तो तसाच चालत पुढे गेला आणि दुसऱ्या गेटवरून आतमध्ये उडी मारून त्याने संरक्षित क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. 9 बीआरडी क्वार्टर्सकडे जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून पुढील तपासासाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विमानतळ पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. परंतु, एअर फोर्सच्या संरक्षित परिसरामध्ये अशाप्रकारे संशयितरित्या हा तरुण घुसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
