डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ०९ चे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभागासाठी विकासाचे भव्य ‘बर्थडे गिफ्ट’ जाहीर करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने थेट विकासकामांची घोषणा होणे ही केवळ औपचारिक शुभेच्छा नसून, प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले ठोस पाऊल आहे.
( Development Push on Lahu Balwadkars BirthdayRevenue Minister Bawankule Announces Mega Plan for Ward 09)
या प्रसंगी मंत्री बावनकुळे यांनी प्रभाग क्रमांक ०९ च्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासाचा स्पष्ट, दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडत अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. यामध्ये महाळुंगे टी.पी. स्कीमला अंतिम मान्यता, शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला गती, तसेच मुळशी धरणातून पुणे शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा यांसारख्या दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण घोषणांचा समावेश आहे.
याशिवाय पुणे ते कात्रज सर्व्हिस रोड सिमेंट काँक्रीटचा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सर्व निर्णयांमुळे प्रभाग क्रमांक ०९ च्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
दरम्यान, लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये आयोजित अभिष्टचिंतन सोहळा राजकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा ठरला. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय वजनही प्राप्त झाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम प्रभावी शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बाणेर व परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना लहू गजानन बालवडकर म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभाग क्रमांक ०९ साठी जाहीर केलेला हा विकास आराखडा म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. हा सन्मान वैयक्तिक नसून, प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी दिलेला विकासाचा ठोस शब्द आहे. महाळुंगे टी.पी. स्कीम, शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो, मुळशी धरणातून पाणीपुरवठा आणि पुणे–कात्रज सर्व्हिस रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.”
वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर झालेला हा विकास आराखडा म्हणजे प्रभाग क्रमांक ०९ साठी नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लहू बालवडकर यांचे वाढते नेतृत्व, प्रभावी जनसंपर्क आणि वरिष्ठ नेत्यांचा मिळणारा पाठिंबा यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आकाराला येण्याची चिन्हे दिसत आहेत.
