घाटकोपरमधील 14 जणांचा बळी घेणाऱ्या कंपनीचा मालकाचा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो व्हायरल; भाजपने विचारला थेट सवाल

मुंबईमध्ये सोमवारी (13 मे 2024 रोजी) वादळी वाऱ्यामुळे भल्या मोठ्या आकाराचं होर्डिंग घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर पडून 14 जण दगावले. या अपघातामध्ये 65 हून अधिकजण जखमी झाले आहेत. सदर प्रकरणावरुन आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच दुसरीकडे राजकारणही सुरु झालं आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या होर्डिंगची मालकी असलेल्या जाहिरात कंपनीच्या मालकाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. कदम यांनी ठाकरे आणि या व्यक्तीचा फोटोही पोस्ट केला आहे.

राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांचा फोटो ट्विट केला आहे. भावेश भिडे हाच पेट्रोल पंपाचा मालक आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. भाजप नेते राम कदम आणि किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.राम कदम यांनी भिडे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. हे मनाला चीड आणणारे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारी सठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर… आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

होर्डिंग प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते म्हणाले, या होर्डिंगला 1 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2022 पर्यंत परवानगी आहे. शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली. 40 फुटांची परवानगी असताना 120 फुटांची परवानगी दिली आहे. याबाबत पोलिसांकडे हरकती नोदवल्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता भावेश हा आपल्या परिवारासोबत पळून गेला आहे. त्याला पोलिसांनी फरार घोषित करावे

सध्या शहरात 400 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तत्कालीन राज्य सरकारने नियमांना बगल देत, ते धाब्यावर बसवत परवानगी दिल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.