जेजे रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष आजपासून कार्यान्वित

मुंबई : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना श्री. महाजन म्हणाले की, तृतीयपंथाच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्य सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथांना पुरुष कक्षात किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे,या विशेष कक्षात तृतीयपंथावर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.

या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथावर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 2 व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर ज.जी. समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे.रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असलयाचेही श्री. महाजन यांनी सांगितले.

पुण्यात व इतर ठिकाणी अशा पद्धतीचं वॉर्ड सुरू करणार : या वॉर्ड विषयी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, तृतीयपंथीय हा सुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा तृतीयपंथी रुग्णांना ऍडमिट करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या आरोग्याबाबत अनेक तक्रारी असतात. हे सर्व लक्षात घेऊन अशा पद्धतीचा पहिलाच देशातील ३० बेडचा वॉर्ड हा त्यांच्यासाठी जीटी हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये ऑपरेशन थेटर, मॉनिटर, आयसीयू अद्यावत सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर, सिस्टर व इतर कर्मचारी अशा १५० लोकांचा स्टाफ सुद्धा असणार आहे. या सर्वांचे योग्य प्रकारे कॉन्सिलिंग सुद्धा करण्यात आले आहे. त्याचबरोबर जीटी प्रमाणे पुण्यात सुद्धा व इतर ठिकाणी अशा पद्धतीचे वॉर्ड सुरू करणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.