राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी कलाटे यांच्याशी चर्चा केली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. त्यानंतरही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन तास बाकी असून कलाटे यांनी अद्यापही कोणताही निर्णय न घेतल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
कलाटे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सचिन अहिर यांनी मीडियाशी संवाद साधला. कलाटे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली आहे. या चर्चेवर मी समाधानी आहे. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. काल विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्याशीही बोलणं झालं. ते अर्ज मागे घेतील असं आम्हाला काल वाटलं होतं.पण त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे मी चिंचवडला आलो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कलाटे यांनी थोडा वेळ मागून घेतला आहे. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. ते सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे, असं सचिन अहिर म्हणाले.
यावर प्रतिक्रिया देत राहुल कलाटे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उद्धव साहेबांचा कुठल्याही प्रकारचा अनादर करण्याचा माझा प्रयत्न नाही. परंतु आधी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो. आज पर्यंत कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलंय. त्यानंतर मी माझा निर्णय कळवतो, सचिन भाऊनं उद्धव साहेबांशी देखील बोलणं करुन दिलं. असे कलाटे म्हणाले.आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी आज शेवटच्या दिवशी कोण कोण आपले अर्ज माघारी घेत आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
