वरातीआधीच घाेडं जयंत पाटील भावी मुख्यमंत्री ; बॅनरची चर्चा

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी ताई आणि दादा यांच्यातच सुप्त स्पर्धा असताना आता जयंत पाटील यांचेही वरातीआधीच घाेडं तयार झाले आहे. मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये भावी मुख्यमंत्री असे लिहिलेली काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राज्याच्या राजकारणात जयंत पाटील यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांचा वारू चाैफेर उधळू नये यासाठी नेहमीच जयंत पाटील यांचा उपयाेग केला. राज्यात काॅंग्रेस- राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडीचे सरकार आल्यावर पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली हाेती. नऊ वर्षे ते राज्याचे अर्थमंत्री हाेते. मुंबईतील 26/11 च्या हल्यानंतर एक वर्षासाठी त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचीही जबाबदारी देण्यात आली हाेती. अजित पवार यांना ही दाेन्ही पदे हवी हाेती मात्र शरद पवार यांनी जाणीवपूर्वक ही पदे त्यांच्याकडे दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे देऊन शरद पवारांनी आपल्यानंतरचे राज्यातील राजकारणाचे अधिकार काेणाकडे असतील हे देखील दाखवून दिले हाेते. त्यामुळे निवडणुकीच्या ताेंडावर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख हाेऊ लागल्याने त्यामागच्या राजकारणाची चर्चा हाेऊ लागली आहे.