सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी नवा खुलासा; फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली ‘आक्षेपार्ह औषधे’

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद रित्या झाल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. ज्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक थांबले होते. त्याठिकाणी पोलिसांनी तपासणी केली असता आक्षेपार्ह औषधं सापडली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. होळीच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची पोलिसांनी लिस्ट तयार केली असून त्यातील एक उद्योजक सध्या फरार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे.

दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस आता पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्या पाहुण्यांची यादी तयार करत आहेत. दुसरीकडे, पार्टीत सहभागी असलेल्या व्यावसायिकाचा या प्रकरणातील वाँटेड यादीत समावेश आहे. याच होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी अभिनेते सतीश कौशिष मुंबईहून दिल्लीला आले होते. विकास मालू या मित्राच्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्याचे हे फार्म हाऊस दिल्लीतील बिजवासन येथे आहे. विकास मालूवर एक वर्षाआधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत.