उपमुख्यमंत्र्यांची अर्थनिती, महिलांना सवलत आणि तोट्यातील एसटीला उत्पन्नाची गती

मुंबई : एसटी महामंडळाला तोट्याच्या गर्तेतून बाहेर आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थनिती चांगलीच यशस्वी झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. आठवड्याभरात 76 लाख महिला प्रवाशांनी प्रवास केला असून महामंडळाला राज्य सरकारकडून येणाऱ्या प्रतिपुर्ती रक्कमेसह ४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

वाट पाहिन पण एसटीने जाईन, अशी जाहिरात पूर्वी केली जायची. मात्र तरीही एसटी प्रवाशांची संख्या कमी कमी होत होती. खासगी बस वाहतूक, वडाप नावाने ओळखली जाणारी वाहतूक यामुळे प्रवाशी एसटी प्रवास टाळू लागले होते. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात गेले. कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघड झाले.

कायमस्वरूपी राज्य सरकारच्या दयेवर
एसटी ठेवणे योग्य होणार नाही हा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कल्पक निर्णय घेतला. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर केली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवासी एसटीकडे वळला आहे. पती – पत्नी प्रवास करत असतील तर पत्नीला अर्धे तिकीट असेल तर पतीही इतर पर्याय शोधण्यापेक्षा तिच्यासोबतच प्रवास करत असल्याचे चित्र आहे. शहरी भागात एसटीचा प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले होते. पण आता कुटुंबेच्या कुटुंबे एसटीत दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात राज्यात तब्बल 76 लाख 3 हजार 322 महिलांनी प्रवास केला. त्यातून महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटीचे तिकीट कमी झाल्यामुळे एसटीचा प्रवास हा इतर वाहतुकीपेक्षा तुलनेने स्वस्त झाला आहे. 17 ते 23 मार्च दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी सर्वाधिक 50 टक्के सवलतीचा प्रवास केला आहे. तब्बल 5 लाख 55 हजार 76 महिलांनी प्रवास केल्याने महामंडळाला 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्याखालोखाल जळगाव 4 लाख 17 हजार 489, सांगली 4 लाख 13 हजार 222, नाशिक 3 लाख 72 हजार 333 आणि रत्नागिरी जिल्ह्यातून 3 लाख 70 हजार 539 महिलांना प्रवास केला.