जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून आज पहाटे भीषण अपघात झाला. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.