विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आज ( १७ एप्रिल ) अजित पवारांनी आपले पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तर, दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “केवळ प्रशासकीय कामासाठी दिल्लीला आलो आहे. नागपुरातील एनटीपीसी प्रकल्पाच्या संदर्भातील प्रश्नासाठी देशाचे उर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याकडे बैठक आहे. तर, आशिष शेलार हे मुंबईवरून दिल्ली आणि नंतर बँगलोरला जातील. त्यामुळे कोणत्याही राजकीय कामासाठी आलो नाही.”
यावेळी त्यांना अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांविषयी विचारले , तेव्हा त्यांनी भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही,असे म्हटले आहे. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश, देव, धर्माला मानणारा कोणीही आला तर त्याचे स्वागतच आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
