रामानंद सागर यांचे रामायण म्हणजे जणू आजही घरा घरात पोहोचलेले एक वरदानच होते. रामायणाने पिढ्या घडवल्या, आणि पुढच्या पिढीत उत्तम संस्कार दिले. या रामायणातील रावण जेव्हा ‘मैं लंकापति रावण’ म्हणत जोऱ्याने हसायचा, आपल्या हृदयाचा एक ठोका चुकायचा, मात्र आज रामायणाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दु:खद बातमी आली आहे, रामायणातील ‘रावण’ यांची भूमिका निभावणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिपाठी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते.

लहानपणी आपल्याला या रावणाच्या भूमिकेचा राग यायचा. रामाला घालून पाडून बोलणारा रावण, सीतेचे हरण करणारा रावण म्हणून मनात एक चीड निर्माण व्हायची. मात्र आता त्याच रावणाची, खलनायकाची भूमिका वठवणाऱ्या अरविंद त्रिपाठी यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
अरविंद त्रिपाठी यांचा जन्म मध्यप्रदेशातील उज्जैन येथे ८ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. त्यांनी गुजराथी रंगभूमी वर मोठ्या प्रमाणात काम केले. हिंदी भाषेतून घराघरात प्रसिद्ध झालेले लंकेश, म्हणजेच अरविंद त्रिपाठी यांनी ३०० हून अधिक हिंदी आणि गुजराथी सिनेमांमध्ये काम केले आहे.
गुजराथी भाषेतील धार्मिक चित्रपटांमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. मात्र सर्वाधिक प्रसिद्धी त्यांना रामानंद सागर यांच्या रामायणातून मिळाली. 2002 मध्ये त्यांनी केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षपदी देखील नेमण्यात आले होते. २० जुलै २००२ ते १६ ऑक्टोबर २००३ पर्यंत त्यांनी केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाच्या प्रमुखपदी कार्यभार सांभाळला.
त्यांच्या जाण्यानी हिंदी आणि गुरजाथी चित्रपट सृष्टी आणि रंगभूमी आज पोरकी झाली आहे. सगळ्यांनाच आपल्या अभिनयाने मोहून टाकणारे ‘लंकेश’ अरविंद त्रिपाठी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच जीवंत असतील.
