शिवसेनेच्या ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. सहा नेत्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसंच नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही सेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.त्याचं बरोबर नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटात ठाकरे गटातील असंख्य कार्यर्त्यांनी आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळवला असल्याचं दिसून येत आहे. सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत मोठी दुफळी निर्माण झाली असून एकीकडे ठाकरे गट पक्षबांधणीसाठी प्रयत्न करत असतानाच राजकीय डावपेचांमुळे ठाकरे गटाला सोडून कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत.
गेली अनेक वर्षे माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी ऋषिकांत शिंदे मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. आपण ज्या विश्वासाने शिवसेनेत सामील होत आहात तो विश्वास आपला सार्थ होईल. मागील 10-11 महिन्यात सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. सर्व योजनांचे फायदे एकाच छताखाली देण्याचे आपण काम करायचं आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.
