‘उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यासाठी संदीप देशपांडेंवर हल्ला’; हल्लेखोराचा चार्जशीटमध्ये उल्लेख

मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी माहिती समोर आली आहे. अशोक खरात यांनी हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता ही बाब जबाबात उघड झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.

उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने निलेश पराडकरला फरार आरोपी दाखवलं आहे. या हल्ल्यात अद्याप तरी राजकीय अँगल नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. निलेश पराडकरचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना 3 मार्च रोजा चार अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही व्यक्तींनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता.

संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची माहीती आरोपींना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.