नागालँड राष्ट्रवादीत एकमत नाही; स्थानिक नेत्यांचा सत्तेत सहभागी होण्याकडे कल

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. परंतु शरद पवार यांच्यासमोर एक वेगळाच पेच निर्माण झालेला असून उद्या त्याबाबत निर्णय होणार आहे.

नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागालँडचे राज्यपाल ला गणेशन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.

नागालँडमध्ये एनडीपी आणि भाजप समर्थित आघाडीला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी त्यांना कोणात्या इतर पक्षांची गरज भासली नाही. पण तरी राज्याचा पूर्व इतिहास बघता सगळेच पक्ष सत्तेत सहभागी व्हायला निघाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्याच मार्गानं जाणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपीचं सरकार स्थापन होणार आहे. निफियू रिओ पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजपनं ६० सदस्यीय राज्य विधानसभेसाठी ४०-२० जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा सत्तेत परतले. एनडीपीपीनं २५ तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं सात, एनपीपीनं पाच आणि नगा पीपल्स फ्रंट, लोजप (रामविलास) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहे. त्याचबरोबर जेडीयूनं एक जागा जिंकली आहे, तर चार अपक्षांनीही विजय मिळवला आहे.

नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत NDPP-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत. भाजपची एनडीपीपीसोबत युती आहे. २०१८ च्या निवडणुकीत रिओ यांनी भाजपसोबत युती केली होती. गेल्या निवडणुकीत युतीला ३० जागा मिळाल्या होत्या. यावेळी युतीने ३७ जागा जिंकल्या.