काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत, ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

राज्यात आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. या दोन्ही गटांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीला अजून आठ ते नऊ महिने बाकी असून येत्या काळात आता काँग्रेसमध्ये फूट पडणार आहे. काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाच भाजपचे माढ्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. नाईक निंबाळकर यांच्या या राजकीय भूकंपाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “लोकसभा निवडणुकांसाठी अजून 08 ते 09 महिने बाकी आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ झाले आहे.या अस्वस्थ आमदार आणि खासदारांनी त्यांची अस्वस्थता मला खाजगीमध्ये बोलून दाखवली आहे. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये देखील फूट पडणार आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं भाजपशी हातमिळवणी केल्यानं देशाचं आणि राज्याचं कल्याण होऊ शकतं. शरद पवार सत्तेत सामील झाले तर नरेंद्र मोदी यांचे हात बळकट होऊ शकतात.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 जागा नक्कीच वाढलेल्या दिसतील. पुढची 10 वर्ष राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार कायम राहील. लोकसभेच्या पुढच्या टर्मसाठी मी तयारच असून पुढच्या निवडणुकीत माढ्याचे आमदार शिंदे बंधूंनी मला निवडून आणण्याकरता सिंहाचा वाटा उचलणार आहेत. पक्षाकडुन जो आदेश येईल. तो मी पाळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.