बारामती तालुक्यात अनेक विकासकामे सुरु आहेत. मोठमोठ्या योजना राबविल्या जात आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात असे काम झाले नाही. आपल्याकडे अनेकदा मोठमोठी पदे आली. चारदा मुख्यमंत्री पद मिळाले, पण अशा योजना आल्या नव्हत्या, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढविला. उंडवडी येथे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंप उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, चार वेळा मुख्यमंत्रीपदासह अन्य महत्त्वाची पदे भूषवूनही बारामतीत फारसे काम झाले नाही. दुर्दैवाने मोठ्या योजना मंजूर होऊ शकल्या नाहीत. पण मी त्याकडे लक्ष दिले आहे. एकट्या बारामतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ६५ कोटींची कामे सुरू असून, वस्त्रोद्योग मंडळाकडून ९ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. बारामती बाजार समितीचा सेस फंड किती आहे, इतर बाजार समित्यांची आज काय स्थिती आहे याची माहिती घ्या, अशी माहिती त्यांनी दिली.
सुदैवाने तुम्हा सगळ्यांनी मला ३०-३२ वर्षे राजकीय जीवनात साथ दिली. खासदार, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे त्यातून मिळाली. मला त्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी समजल्या. कोणकोणत्या विकासकामांसाठी कसा पाठपुरावा करायचा, कशा प्रकारे निधीची तरतूद करायची, बजेटमध्ये कामे कशी घालायची, पुरवणी मागणीतून निधी कसा आणायचा हे मला समजले. त्यातून अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, भटक्या समाजाला, बेघर लोकांसाठी घर बांधणी कार्यक्रम आदींसाठी भरीव निधी आणला असल्याचे ते म्हणाले.
बाजार समितीने सुपा येथे जागा घेतली. पण ती खड्ड्यात होती. तेथील तलावाच्या खोल करणादरम्यान ती जागा भरुन काढली. सुपा आणि सुपा परगणा गावांमध्ये रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांची १००० कोटींची कामे सुरू आहेत. लोक विश्वास ठेवणार नाहीत. एका आमदाराला वर्षभरात ५ कोटींचा निधी मिळतो, हजारो कोटींची कामे येथे सुरू आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
