अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभते का ?

नुकताच दसरा झाला, आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. मात्र यावेळी या दसरा मेळाव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा. खरं तर दसरा म्हणजे प्रतीक आहे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे, काहीतरी सकारात्मक घडवण्याचे, आणि सकारात्मक विचार मांडण्याचे. शिवसेनेकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एक मोठी संधी चालून आली होती, सकारात्मक बोलण्याची, मात्र त्यांनी अशा भाषेचा वापर करत आपली मतं मांडली, जी भाषा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. उभा महाराष्ट्र हा प्रश्न उपस्थित करतो कि, अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभते का?

या शिवसेना दसरा मेळाव्यात ते म्हणतात, “मी वाघाची अवलाद आहे, मला डिवचायचं नाही, आज मी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून बोलणार आहे. संघाचे लोक काळ्या टोप्या घालता, त्या टोप्याखाली मेंदू आहे का?” अशा पद्धातीचं वक्तव्य करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय देखील त्यांनी ‘बाप’ या शब्दाचा उल्लेख करत अशा भाषेत वक्तव्य केलं, जे आपण मुख्यमंत्र्यांच्या तोंडी विचार करू शकत नाही.

महाराष्ट्राने गेली ५ वर्षे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बघितलं आहे. अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य अशा मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला सवय झाली असताना अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचावर येऊन गावगुंडांच्या भाषेत आपलं वक्तव्य सादर करावं, ते देखील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तर महाराष्ट्राचे यासारखे मोठे दुर्भाग्य असेल ते काय?

एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडून अरेरावीची, गुंडगिरीची भाषा शोभते का ? तेही तेव्हा जेव्हा ते दसऱ्याच्या मेळाव्यात बोलताएत ?

खरंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मोठी संधी होती, महाराष्ट्राचं भविष्य काय असेल हे सांगण्याची, कोरोनावर मात करण्यासाठी ते काय काम करत आहेत हे सांगण्याची, महाराष्ट्राच्या जनतेच्या खचलेल्या आत्मविश्वासाला उभारी देण्याची, शिवसैनिकांमध्ये आलेल्या मरगळीला दूर करण्याची आणि स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याची. मात्र गेल्या साधारण एक वर्षांत ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून कुठलीही जबाबदारी नीट पार पाडली नाही, अशा मुख्यमंत्र्यांच्या मुखातून आणखी कुठल्या भाषेची आपण अपेक्षा करणार?

महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात एक अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य मुख्यमंत्री लाभले होते. आज महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुंडगिरीचे बोल ऐकून नक्कीच त्रास झाला असणार. महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे मात्र आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *