कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून जनतेला मदत करणारे, ओला दुष्काळ आल्यानंतर खाच खळग्यातून, ओढा ओलांडत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे आणि सदैव जनतेसाठी काम करत असताना कोरोनाचा हल्ला समर्थपणे पेलणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या नावाचा झेंडा आता बिहार मध्येही उंच आभाळात फडकतोय. बिहार निवडणुकीची सर्व जबाबदारी भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ खांद्यांवर सोपवली होती. ऐन कोरोनाच्या काळात, महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला असताना, ती सर्व कामे व्यवस्थित पार पाडून फडणवीसांनी संपूर्ण बिहारभर दौरे आणि सभा केल्या, जनतेपर्यंत बिहारच्या विकासासाठी काय गरजेचे आहे, हे पोहोचविले, आणि आज बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. यामागे विजन, मिशन आणि इम्प्लिमेंटेशन होतं ते देवेंद्र फडणवीस यांचं, आणि त्यांच्या मेहनतीचं चीज म्हणजे आज बिहार मध्ये जनतेला आर्थिक आमिषांपेक्षा खरा विकास महत्वाचा वाटतो, आणि त्यामुळेच आज बिहार मध्ये देखील फडणवीसांच्या नावाचा जयजयकार होत आहे.
बिहार हे राज्य अनेक वर्षांपासून मागासलेलं आहे, त्यामागे अनेक कारणं आहेत. बिहार येथून मोठ्या प्रमाणात एमपीएससी यूपीएससी परीक्षा पास करून ऑफिसर बनणारी मंडळी जरी येत असली, तरी हे राज्य आर्थिक विकास, रोजगार, मूलभूत गरजा, स्वच्छता या सर्वच बाबतीत इतर राज्यांपेक्षा जरा मागे राहिलं होतं, त्यामागे एका विशिष्ट पक्षाचा एकाधिकार, भ्रष्टाचार असू देत नाही तर अनेकदा गलिच्छ राजकारण, मात्र नितीश कुमार यांच्या सोबत एनडीए सरकार बिहार मध्ये स्थापन झालं, आणि बिहार राज्याचे चित्र हळू हळू बदलाएला लागले. मात्र आजही बिहारच्या जनतेपर्यंत हे सर्व पोहोचविणे एक कठीण काम होते, ते कठीण काम या निवडणुकींमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी चोख करून दाखवले.
त्यांच्या नेतृत्वात बिहार येथील सर्व सभा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियम पाळत पार पडल्या. मुळात देवेंद्र फडणवीस हे जनतेचे नेते आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची सौम्य भाषा, त्यांची देहबोली ही जनतेला कनेक्ट करू शकणारी आहे, त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या सर्व सभा होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली, मात्र तरी देखील त्यांनी काम करण्याचे थांबविले नाही. मुंबई येथील शासकीय रुग्णालयात दाखल असताना फोन आणि एसएमएसच्या माध्यमातून ते सतत पक्ष नेत्यांशी संवाद साधत होते. सतत बिहार येथील कामाविषयी दखल घेत होते. फोन आणि एसएमएसच्या माध्यमातून करू शकता येणारी सर्व कामे त्यांनी या भयंकर आजाराने ग्रस्त असताना देखील केली, आणि आज त्या सर्व कामांचे फळ आपल्याला दिसून येत आहे.
नेता असा असावा जो कार्यकर्त्यांना जोडून ठेवतो. कार्यकर्त्यांना ज्याच्या पर्यंत पोहोचणे शक्य असेल, देवेंद्र फडणवीस एक असेच नेते आहेत. आणि त्यांच्या याच स्वभावामुळे आज त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर बिहार येथील कार्यकर्त्यांनाही जोडून ठेवले, आपलेसे केले. आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आज बिहार येथील जनतेला नितीश कुमार आणि त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षावर विशेषकरून अधिक विश्वास जाणवला.
बिहार मध्ये असलेल्या निवडणुकींसोबतच मध्यप्रदेश, तेलंगना, कर्नाटक आदि राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष हा सत्तेचा माज असणारे नेते नाही तर जन सामान्याच्या मनात बसतील असे व्यक्तिमत्व तयार करतो. आणि देवेंद्र फडणवीस त्यातीलच एक आहेत.
त्यांना अनेकांनी हिणवलं, त्यांच्या देहयष्टीवर, परिवारावर, जातीवर टोमणे मारले. मात्र मेहनतीने मिळवलेली सत्ता एका गलिच्छा राजकारणामुळे गमावल्यानंतरही त्यांचे काम थांबले नाही, त्यांची जनकल्याणाची कामे थांबली नाहीत, त्यांचे प्रवास थांबले नाही, ते थांबले नाहीत.
देवेंद्र नावाच्या या व्यक्तिचे भविष्य खूप चकाकदार आहे, उज्ज्वल आहे, कारण ते जनतेच्या मनात बसतात, आणि आज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर बिहारच्या जनतेने देखील सिद्ध केले आहे.
