महाराष्ट्रात सध्या जे घडतंय के आणीबाणीची आठवण करुन देणारे आहे. ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामी सोबत अत्याचार करण्यात येत आहेत, त्याला दहशतवाद्याहूनही खराब वागणूक देण्यात येत आहे, त्याला मारहाण केली जात आहे, हे अतिशय घृणास्पद आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे याकडे बघत राहण्याशिवाय पर्याय नाही, यासारखी या महाराष्ट्राची शोकांतिका नाही.
एकूणच महाराष्ट्रात आघाडी सरकार आल्यापासून (मी निवडून आले, असे म्हणणार नाही, कारण हे सरकार हट्टाने पेटून, खुर्ची ओरबाडून कपटाने स्थापन करण्यात आलेले सरकार आहे.) महाराष्ट्राच्या वैभवाला, समृद्धला आणि विकासाला गळती लागली. महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षात जी काही प्रगति केली होती, ती एक एक करून धोक्यात येऊ लागली, मग ते मेट्रो प्रोजेक्ट्स असतील किंवा इतर कामांची स्थगिती. मात्र आता तुम्ही जर सरकार विरोधात बोललात तर तुमचे काय होईल, याची प्रचिती आणणारे प्रकरण म्हणजे रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांच्या सोबत घडलेले थरार नाट्य आहे. दोन वर्षांआधी बंद पडलेल्या केसला पुन्हा रिओपन करत अलिबाग पोलिसांनी ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामीला फरफटत नेले आहे, ते अतिशय भयानक आणि लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. अर्णब गोस्वामीला केवळ अटकच करण्यात आलेली नाही, तर त्याला मारहाण करण्यात आली आहे, एका वरीष्ठ पत्रकारासोबत ही अशी वागणूक, केवळ तो सरकार विरोधात खुल्या पद्धतीने, सगळ्यांसमोर येऊन पुराव्यासकट बोलला म्हणून ? या पेक्षा घाणेरडं राजकारण बघितलं आहे तुम्ही कधी ?
मुळात आघाडी सरकारला सत्ता स्थापन करण्याचा अधिकार संविधानात असला तरी जनतेच्या मते नाहीये. कारण लोकशाही म्हणजे जनतेच्या मतांचा आदर करून स्थापन केलेले सरकार. छलावा करून जेव्हा एखादं सरकार स्थापन केलं जातं, त्यावेळेला त्यामागचा हेतू हा स्पष्टच असतो, जनतेचं कल्याण, जनतेच्या प्रश्नांना उत्तरं, जनतेसाठी असलेलं सरकार असं काही त्यात नसतंच, त्यात असतो तो केवळ स्वार्थ. आणि महाराष्ट्रात मुळात हेच झालं. आता या सरकार विरोधात तुम्ही अवाक्षरही काढलं, तर तुम्हाला एखाद्या नेत्याच्या बंगल्यात नेऊन बुलकून काढण्यात येईल, किंवा तुम्ही रिटायर्ड आर्मी ऑफिसर असाल तरी सुद्धा तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारहाण करण्यात येईल, किंवा तुम्ही अर्णब सारखे वरीष्ठ पत्रकार असाल, जे सरकार विरोधात खुलून, पुराव्यानिशी नॅशनल टेलिव्हिजन वर बोलता, तर मात्र तुम्हाला एखाद्या प्रकरणात अडकवून अटक करण्यात येईल, मरण यातना देण्यात येतील, त्रास आणि मानसिक छळ करण्यात येईल. हेच या आघाडी सरकारचे संस्कार आहेत, हीच या आघाडी सरकारची पद्धत आहे.
आणीबाणी लावणारं काँग्रेस आठवतं ना? आता तेच काँग्रेस आणि त्याला समर्थन देणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. म्हणजे आता महाराष्ट्रात लोकशाहीला जागा नाही, लोकशाहीचा आदर नाही हे निश्चित, अशीच आज सामान्य माणसाची भावना झालेली आहे.
तुम्हाला कसा महाराष्ट्र हवाय? तुमच्या मतांचा आदर करणारा ? तुमच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याला जपणारा ? का तुम्ही सरकार विरोधात काही बोललात तर तुम्हाला जेल मध्ये डांबून मरेस्तोवर मारणारा ? ठरवायचं तुम्हाला आहे. एक सामान्य माणूस म्हणून पुढे येवून या अर्णबच्या समर्थनात उतरण्याची आता वेळ झालेली आहे. वेळीच निर्णय घ्या, अन्यथा कदाचित पुढचा नंबर आपल्या पैकी कुणाचा असेल?
