
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या या युद्धात आता अनेक देशांचे हात पोळायला लागले आहेत. युक्रेनच्या खारकीव्ह येथे गव्हर्नर हाऊस येथे झालेल्या बॉम्ब हल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील नवीन शेखरप्पा या २१ वर्षीय तरुणाला आपले प्राण या हल्यात मुकावे लागले. घरातून खाद्य सामग्री घेण्यासाठी बाहेर पडलेला हा २१ वर्षीय तरुण सुपरमार्केटच्या रांगेत उभा होता, जेव्हा हा हल्ला झाला.
नवीन शेखराप्पा हा मूळचा कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील. तो युक्रेनमध्ये मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी गेला. खारकिव्हमधील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तो चौथ्या वर्षात शिकत होता. रशियन सैन्याने केलेल्या एका एअरस्टाईकमध्ये त्याचा मृत्यू झाला.
खारकिव्हमधील शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या समन्वयक असलेल्या डॉ. पूजा यांनी सांगितलं की, नवीन शेखराप्पाचा मोबाईल फोन या हल्ल्याच्या ठिकाणी सापडला. त्याचे प्रेत हे शवगृहात पाठवलं आहे. या घटेनेची माहिती नवीन शेखराप्पासोबत शिकत असलेल्या एका मुलीने दिली.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी नवीन शेखराप्पाच्या घरी पोहोचले असून त्यांनी नवीनचे प्रेत हे शवगृहात पाठवल्याची माहिती त्यांना दिली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न :
युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. किव्हमधील दूतावासात आश्रयाला आलेल्या जवळपास 400 विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर रवाना करण्यात यश आलंय. आत्तापर्यंत 1000 जणांचं स्थलांतर पूर्ण झालं आहे. काही विद्यार्थी अजूनही किव्हच्या काही भागात आहेत. त्यांनी कर्फ्यू उठताच युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे जावं असं भारतीय दूतावासानं सांगितलंय.
