देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत, आम्ही देखील मुंबई येथे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या हंडीला फोडण्यास सज्ज आहोत : देवेंद्र फडणवीस


“देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचे काम चालू आहे. आपण जागोजागी समोर येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे बघू शकतो. आम्ही देखील मुंबई येथे महानगर पालिकेच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यास सज्ज आहोत.” असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुंबई येथे मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी आणि दहीहंडीचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आज महाराष्ट्र सरकारने ‘दहीहंडी’ला साहसी खेळाचा दर्जा दिला. याविषयी बोलताना ते म्हणाले कि, “आजचा दिवस हा राजकारणाचा दिवस नाही. आज जन्माष्टमी आहे. मी आपण सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी आमच्या सरकारने गोविंदांसाठी ‘दहीहंडी’ला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. आजचा दिवस साजरा करण्यासाठीच आहे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.


आज राज्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी गोविंदांचे मोठमोठे थर लागले होते. एकूणच कोव्हिड काळात हरवलेला हा उत्साह आज मुंबईला आणि एकूणच महाराष्ट्राला पुन्हा एकदा बघायला मिळाला. आजचा दिवस खरंच साजरा करण्यासारखाच आहे. हे या सर्व दृष्यांमधून सिद्ध झाले.