मुंबई : देवी मातेचा काेप हाेईल रेड्यांप्रमाणे बळी जाईल हिच प्रबाेधनकारांची प्रतिमा ‘सामना’मधून चालवित आहात का असा सवाल उध्दव ठाकरे यांना करण्यात येत आहे. ‘सामना’मध्ये लिहिलेल्या आजच्या अग्रलेखात श्री देवी भराडी मातेचा काेप हाेईल आणि तुमच्या राज्याचा गुवाहाटीतील रेड्यांप्रमाणे बळी जाईल असे म्हटल्याने टीका केली जात आहे.
महाराष्ट्रात अंधश्रध्दा आणि जादूटाेणा विराेधी कायदा आहे. त्यातील कलम 2 नुसार चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे आणि प्रसारित करणे आणि अशा प्रकारे लोकांना फसवणे किंवा भयभीत करणे, हा गुन्हा मानला गेला आहे. ‘सामना’च्या संपादकांवर हा गुन्हा का दाखल हाेऊ नये, असा सवाल केला जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नाणारचा प्रकल्प हाेणारच’ असे आश्वासन भराडी मातेच्या यात्रेत दिले. त्यावरून ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे की, नाणारचा प्रकल्प करू नका असा भराडी देवीचाच काैल आहे. ताे काैल टाळून काही कराल तर देवीचा काेप हाेईल.
प्रबाेधनकार ठाकरे यांनी आपल्या ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात सार्वजनिक वाचनालयें, संशोधनशाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल-क्लब्ज, व्याख्यानमंदिरें, तालीमखाने, सहभोजनशाळा इत्यादि नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळांचा सदुपयोग अभेद भावानें करता येणें शक्य आहे.’ असे क्रांतीकारी विचार मांडले हाेते. मात्र, त्यांचाच वारसा सांगणाऱ्या ‘सामना’मधून अग्रलेखात देवीचा काेप, रेड्यांचा बळी अशी भीती दाखविली जात आहे. प्रबाेधनकारांवरील त्रिखंडात्मक ग्रंथाच्या प्रदर्शनावेळी उध्दव ठाकरे म्हणाले हाेते की, धर्माच्या नावावर चालणारे ढोंग त्यांना आवडत नव्हते. देश हाच धर्म अशी शिकवण प्रबाेधनकारांनी दिली हाेती. मग त्यांच्या शिकवणुकीचा विसर उध्दव ठाकरे यांना पडला का? असा सवालही हाेत आहे.
यापूर्वीही उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघ मुख्यालय भेटीवर बाेलताना संघ मुख्यालयातील काेपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा असे विधान केले हाेते. अंधश्रध्दा आणि जादूटाेणा विराेधी कायद्याच्या कलम सहा नुसार एखाद्या व्यक्तीवर काळा जादू करण्याचा किंवा सैतानचा अवतार असल्याचा आरोप, त्याच्यावर / तिच्यावर रोग किंवा दुर्दैवी कारणीभूत असल्याचा आरोप करणे आणि त्या व्यक्तीला त्रास देणे हा देखील गुन्हा आहे. त्यावरूनही उध्दव ठाकरे यांच्यावर टीका झाली हाेती.
