मांजर आडवी ते नाना पटाेलेंवर नाशिकपासून विदर्भापर्यंत नाराजी…

पुणे : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांना एक मांजर आडवी जाऊ लागली हाेती. ही मांजर काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हुसकावली. पण थाेरात यांच्यासाेबतचा वाद, विदर्भातील नेत्यांची नाराजी नाना पटाेले कशी थाेपवणार अशी चर्चा सुरू आहे.

पक्षांतर्गतवादामुळे नाना पटाेले पक्षपातळीवर अडचणीत आले असल्याने या प्रकाराची चर्चा हाेऊ लागली आहे. मांजर आडवी चाललेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. याचे कारण म्हणजे
प्रदेश काॅंग्रेसमध्ये सध्या जाेरदार वादंग सुरू आहे. नाना पटाेले यांच्याविराेधात बाळासाहेब थाेरात यांनी केलेल्या आराेपांमुळे पटाेले यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थानबराेबरच महाराष्ट्रातील पक्षसंघटनेतही बदल करण्याचा निर्णय राहूल गांधींनी घेतला आहे. त्याचा संबंध आता मांजर आडवी गेल्याच्या प्रकाराशी लावला जात आहे.

विदर्भातील नेतेही नाना पटाेले यांच्यावर संतप्त आहेत. स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचा सुधाकर आडबाले यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. तरी आडबले यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे चिडून जाऊन
विदर्भातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आडबाले यांच्या उमेदवारीची घोषणा केली हाेती. या नेत्यांकडूनही नाना पटाेले यांच्याविरुध्द तक्रारी करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या बाजुला पटाेले यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसशीही पंगा घेतला आहे. अजित पवार यांच्यावर नाशिक पदवीधर मतदारसंघातील वाद चव्हाट्यावर आणल्याचा आराेप केला. शिवसेनेशीही त्यांचे जमत नसल्याचे चित्र आहे. 13 फेब्रुवारी राेजी प्रदेश काॅंग्रेसची बैठक हाेणार आहे. यावेळी पटाेले यांच्याविरुध्दचा संताप बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांची गच्छंती हाेणार असल्याची चर्चा वाढली आहे.