राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्यातच काल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता. या आव्हानांवर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या आव्हानांवर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी लवकरच राजीनामा द्यावा आणि मंजूर करुन घ्यावा. त्यांनी टीव्हीवर आव्हान देऊ नये. पटकन राजीनामा लिहायचा आणि राज्यपालांकडे द्यायचा. मग मैदानात उतरण्याचे आव्हान द्यावे. आम्ही एखाद्या फाटक्या माणसाकडून त्यांचा पराभव करु दाखवू. असं ते म्हणाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
