कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी टिळक कुटुंबाची इच्छा होती. मात्र पुण्यात टिळक कुटुंबाला डावलून भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे पुण्याचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ब्राह्मण समाजामध्ये देखील रासने यांच्या उमेदवारीने नाराजी असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाना साधला होता. आता नाना पटोले याच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“ही निवडणूक बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले असे म्हणतात की टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर आम्ही बिनविरोधचा विचार केला असता. माझे नाना पटोलेंना आवाहन आहे, टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का?” असा सवाल पाटलांनी पटोलेंना केला आहे. भाजपने चिंचवडमध्ये जगतापाच्या घरात उमेदवारी दिली आहे त्याठिकाणी आघाडी उमेदवार देणार आहे त्याचे काय? असे रोखठोक सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे, यावर नाना पटोले काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यासोबतच ते म्हणाले की महाविकास आघाडीचंच एकमत होत नाही आहे. चिंचवड मतदार संघात उमेदवारी लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबात दिली आहे त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार असं घोषित करुन टाका असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
