पुणे : गाैतम अदानी प्रकरणाला ‘अदानीगेट’ म्हणत काॅंग्रेस देशभर आंदाेलन करत असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू राेहित पवार अदानी यांच्या बचावासाठी उतरले आहेत. मिसगाईड करणे हे हिंडनबर्गचे काम आहे, असा आराेप त्यांनी केला आहे.
साेलापूर येथे पत्रकारांशी बाेलताना राेहित पवार म्हणाले, हिंडनबर्ग सारख्या कंपनीने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असे उद्योग सुरू केले आहेत. त्यांचा धंदाच असा आहे. ते उलटी पाेझीशन घेतात. शेअर पडत गेले की त्यांना नफा जास्त हाेता. अदानी सारख्या कंपनीचे शेअर्स पडले की ते खरेदी करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. या कंपनीने जे स्टेटमेंट काढले ते सिध्द करण्यासाठी वेळ जाणार आहे. त्यामुळे बाजार खाली आला. त्यामध्ये हिंडेनबर्ग कंपनीने माेठ्या प्रमाणावर पैसा कमावला आहे. परंतु, सामान्य लाेकांनी तसेच एलआयसी, एसबीआयने पैसा टाकला हाेता त्याला माेठ्या प्रमाणात अडचण आली आहे. ईडीच्या बाबत हाेते की पुरावे देण्यामध्येच वेळ जाताे. एखाद्या व्यक्तीने झिराेपासून सुरू करून कंपनी उभी केली असेल तर पुन्हा उभी करण्यासाठी वेळ जाताे.
काेणत्याही उद्याेगाकडे मी एकाच दृष्टीने बघताे की त्यांची युवकांना राेजगार देण्याची क्षमता. देशात रोजगार देण्यामध्ये अदानी हे चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे अदानींनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीतून काढले पाहिजे नाही. गाैतम अदानी यांनी काही महिन्यांपूर्वी बारामतीला भेट दिली हाेती. यावेळी बारामती विमानतळापासून राेहित पवार यांनी स्वत: त्यांच्या गाडीचे सारथ्य केले हाेते.
