युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार का हे पाहावं लागणार आहे.आज सायंकाळी 6 वाजता वरळीच्या आदर्श नगरमधील वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे.या कार्यक्रमात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आता या दोन्ही नेत्यांचे वाग्बाण कुणाला घायाळ करतात ते पाहावं लागणार आहे.
या निमित्ताने वरळीत शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. ज्या मंचावरून ही सभा होणार आहे तो मंचदेखील तयार करण्यात येत आहे. या भव्य मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार होणार आहे. यावेळी ते आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
किरण पावसकरांकडं तयारीची जबाबदारी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी शिंदे गटाचे नेते किरण पावसकर पूर्ण तयारी करत आहेत. जाहीर आणि भव्य अशी सभा व्हावी, यासाठी जय्यत तयारी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर होत आहे.
