पुणे : चिंचवड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवून उमेदवारी नाकारल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. अजित पवारांचे राजकारण नाकारत अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. कलाटे यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेकडून तर 2019 ची विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कलाटे यांनी कडवी झुंज दिली होती. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली.
कलाटे म्हणाले, ‘गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, मला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. मलाच मतदार सहानुभूती दाखवतील असा विश्वास आहे. कलाटे यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
