काँग्रेसमध्ये भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात वाद विकोपाला जाऊन बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. बाळासाहेब थोरात यांनी कालच पत्र लिहून पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी व्यक्त केली होती.

नाना पटोले यांनी पत्र दाखवा असे म्हणत त्यांना आव्हान दिले होते. याबाबत 13 फेब्रुवारी रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार होती. त्यापूर्वीच थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांचा राजीनामा प्रेशर टॅक्टिक असल्याचीही चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. थोरात यांच्या राजीनाम्याने पटोले यांचे पद धोक्यात आले आहे.