धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार ; मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस नोकर भरती कारभार सुरु असल्याचं उघड झालंय. मुंडे यांच्या नावाचा वापर करून लिपिकाच्या नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आल्याचं आढळलंय. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केलेली असली तरी हे रॅकेट अजून किती विस्तारलेलं आहे, या शंकेने मंत्रालयात खळबळ माजली आहे. बोगस लिपिक भरती रॅकेट प्रकरणी गोवंडी पोलिसांनी मंत्रालयातील एक कर्मचारी तसेच अन्य तीन व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. तसेच निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकर या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर निखिल माळवे याला अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट आणखी किती फोफावलंय यात कुणा मोठ्या अधिकारी किंवा नेत्याचा हात आहे का? याची चौकशी केली जातेय.

‘या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही.या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे असे एका माध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतरकर विरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे. यामध्ये कुठल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा सहभाग आहे? याबाबत अधिक शहानिशा सुरू असल्याचे गोवंडी पोलीस करत आहे.