पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली.

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते असून माजी मंत्री आहेत. बुधवारी सायंकाळी 6.45 वाजता अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भादंवी कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब), या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे.