भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच चेतन शर्मा यांचे एक स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त नसतानाही मैदानावर पुनरागमन करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटू विशिष्ट इंजेक्शन घेत असल्याचा गौप्यस्फोट शर्मा यांनी केला होता. त्यानंतर आता शर्मा यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी निवड समिती रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर नंतर बोलावण्याच्या तयारीत आहे. मात्र तत्पूर्वी ही बातमी आली आहे. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये रोहित शर्मा हार्दिक पंड्या, रोहित विराट वाद. विराट गांगुली कर्णधारपदावरून वाद या सर्व मुद्द्यांवर उघडपणे चर्चा केली होती. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते चांगलेच अडचणीत आले.
शेवटच्या दोन कसोटी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी निवड समितीने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत बसायचे होते. मात्र अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत बीसीसीआय चेतन शर्मा यांना बैठकीला येण्यापासून रोखण्याची शक्यता आहे. चेतन शर्मा यांना सभांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारल्यास, शिव सुंदर दास हे अंतरिम अध्यक्ष असतील.
