अंजनी – पद्मालय प्रकल्पामुळे पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंजनी – पद्मालय प्रकल्पासह राज्यातील २२ प्रकल्पांना राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील ५ लाख हेक्टर तर पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.पारोळा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

पारोळा-एरंडोल तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. पारोळा व एरंडोलच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला पद्मालय प्रकल्पास ३७० कोटी व अंजनी मध्यम प्रकल्पास २३१ कोटी रूपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याने हे तालुके सुजलाम् होण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ४३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणाऱ्या निम्नतापी प्रकल्पाच्या गतिमानतेसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच शिवजयंतीचा उत्सव होणार ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. राज्य सरकारच्या लोकाभिमुख कामांची दखल देश व जागतिक पातळीवर घेतली जात असून विकास कामे करतांना लोकांचे प्रेम मिळत आहे. सहा महिन्यात शासनाने शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्य सरकार सर्वसामान्यांचे आहे. महाराष्ट्रातील जनता सुखी झाली पाहिजे या एकाच ध्येयाने सरकार काम करत आहे. असेही ते म्हणाले. जळगांव जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कापसाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.