आयपीएल चे वेळापत्रक जाहीर; गुजरात विरुद्ध चेन्नई पहिली लढत

आयपीएल २०२३ची सुरुवात ३१ मार्च रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २०२३च्या हंगामातील पहिली लढत विद्यमान विजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. ही लढत अहमदाबाद येथे होतील. पहिल्या मॅचची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी डबल हेडर खेळवली जाईल. यातील पहिली मॅच पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात तर दुसरी लढत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल.

आयपीएल 16 मध्ये 70 लीग सामने खेळवले जातील
या हंगामात आयपीएलमध्ये 10 संघांमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील, ज्यामध्ये 18 डबल हेडरचा समावेश आहे. शेवटचा लीग टप्पा सामना 21 मे रोजी आहे, तर अंतिम सामना 28 मे रोजी होईल. आयपीएल 2023 चे सामने अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

आयपीएल 2023 मध्ये 10 संघ दोन गटात विभागले गेले आहेत. साखळी टप्प्यात सर्व संघांना 14 – 14 सामने खेळायचे आहेत. यावेळीही सर्व संघांना 7 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि नंतर 7 सामने विरोधी कॅम्पच्या घरच्या मैदानावर खेळावे लागणार आहेत. दुपारचे सामने 3.30 वाजल्यापासून, तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजल्यापासून खेळवले जातील.