महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आज रमेश बैस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन,अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तीव्र लाट उसळली होती. अखेर कोश्यारी यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्याच आठवड्यात त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता. आज राजभवनात बैस यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडला.
मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी बैस यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. रमेश बैस हे राज्याचे 14वे राज्यपाल म्हणून नियुक्त होणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस हे तब्बल सात वेळा खासदार राहिले आहेत. बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये सर्वात आधी नगरपालिकेत निवडून गेले होते. यानंतर 1980 ते 1984 मध्ये आमदार म्हणून मध्यप्रदेश विधानसभेत ते निवडून गेले होते. त्यानंतर रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. सोबतच त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यानंतर रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. यासोबतच ते मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष देखील होते.
