शिंदे सरकारकडून शिक्षण सेवकांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीसांनी शिक्षणसेवकांच्या मानधनात तब्बल १० हजार रुपयांची भरघोस वाढ केली आहे.
फडणवीस यांच्या या घोषणेनंतर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपये होणार आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये होणार आहे. शिवाय उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये होणार आहे.त्याशिवाय पीएमश्री ८१६ शाळांना ५ वर्षांत १५३४ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची २० हजार पदे भरली जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासोबतच अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपये करण्यात आले आहे तर अंगणवाडी मदतनीसांचे मानधन ४ हजार ५०० वरुन ५ हजार ५०० इतके करण्यात आले आहे.
