आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका; हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा रडत माध्यमांसमोर

आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ माध्यमांसमोर आल्या. त्यामुळे मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा संताप वाढला आहे. शनिवारी पहाटेच हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीच्या पथकाने धाड टाकली. घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नींसह काही महिला व मुले आहेत. त्यांच्या उपस्थितीतच ईडीच्या पथकाकडून घराची झाडाझडती घेतली जात आहे. दीड महिन्यातच दुसऱ्यांदा अशा पद्धतीने ईडीने धाड टाकल्याने हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ प्रचंड संतापल्या तसेच माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले. रडत सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितले की, समाजासाठी मुश्रीफ साहेबांनी आजवर खूप काम केले. अजूनही करत आहेत. मात्र असे असूनही ईडीकडून आम्हाला त्रास दिला जातोय. आणखी किती त्रास देणार आहात? आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका आणि इथून जा.

सायरा मुश्रीफ यांच्या या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या भावनिक आवाहनानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काही झाले तर आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दांत त्यांनी सायरा मुश्रीफ यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच, केंद्र सरकार, भाजप व ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.