जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का! जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार विजयी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.महाविकास आघाडीत फूट पडल्याने संजय पवार विजयी झाले आहेत.

जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. मात्र संजय पवार यांनी बंडखोरी करत, उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिंदे गट यांनी एकत्र येत खडसेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे दिसून आले. त्यांना ठाकरे गटाच्या एका संचालकाची मदत मिळाल्याची चर्चा आहे. त्याला अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीची मते फुटल्याचे उघड असून बहुमत पाठीशी असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरपाठोपाठ जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

उपाध्यक्षपदी अमोल पाटील बिनविरोध…
उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत अमोल पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड झाली.